Monday 16 December 2013

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची ..........

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा वाघ्याचा पुतळा तुकोजीराव होळकरांच्या देणगीतून निर्माण झाल्यामुळे धनगर समाज्याच्या या पुतळ्याबद्दल अत्यंत पूज्य भावना आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा उध्वस्त करण्याची घोषणा केल्यापासून धनगर समाज आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. धनगर समाजाच्या या अस्वस्थतेतून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जे सिद्ध होईल ते सत्य सर्वांनाच स्वीकारावे लागेल. परंतु संभाजी ब्रिगेडने पुतळा उध्वस्त न करता धनगर समाजाशी चर्चा करून विश्वासाने हा प्रश्न सोडवावा. नाहीतर मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले तर बहुजन चळवळीची हानी होईल. वाघ्या कुत्र्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते झारगड मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती सर्वांच्या माहितीसाठी सह्याद्री बाणा वर उपलब्ध आहे.
- प्रकाश पोळ 
रायगड किल्ल्यावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा घाट संभाजी ब्रिगेडने घातला आहे. केवळ शिवचरित्रात वाघ्य्याच्या आस्तित्वाचे लिखित पुरावे सापडत नाहीत म्हणुन वाघ्याचे उच्चाटन करण्याचे त्यांचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे पत्रक धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते व झारगड मामा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे हे खरे असले तरी दंतकथांना सत्याच्या बीजाचा आधार असतो. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरीं यांनी केवळ कल्पनेच्या जोरावर वाघ्याचे पात्र निर्माण केले असा युक्तिवाद संभाजी ब्रिगेड करत आहे तो ग्राह्य धरता येणार नाही. दुसरे असे कि ज्या जागेवर हे स्मारक उभारले गेले आहे तेथे पुर्वी एक उद्ध्वस्त चौथरा होता. तो चौथरा शिवाजी महाराजांच्या कोणा राणीचे असल्याचाही उल्लेख इतिहासात नाही किंवा तशी दंतकथाही नाही.  अशा स्थितीत वाघ्याचा वाद पेटवून त्यावर राजकारण करून समाज-स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बहुजन समाजामद्धे फुट पाडण्याची ही राजकीय चाल हाणुन पाडली जाईल असा इशारा त्यांनी या पत्रकात दिला आहे.

निधीअभावी  ज्यावेळी शिवस्मारकाचे काम अडुन पडले होते त्यावेळी मदत करायला पुढे सरसावले ते शिवप्रेमी तुकोजी महाराज.ही सर्वात महत्वाची बाब आज मुद्दाम दडवली जात आहे. शिवस्मारकासाठी एकमेव मोठी देणगी तुकोजीमहाराजांची आहे आणि त्या काळी त्यांनी शिवस्मारकाला रु. ५०००/- ची देणगी दिली. ही देणगी मागायला पुण्यातुन श्री. जी.व्ही. काळे आणि श्री ग.वि. केतकर इंदोरला गेले होते. त्याच वेळी  तुकोजीरावांच्या लाडक्या कुत्राचाही दुर्दैवाने म्रुत्यु झाला होता. तुकोजीराव दु:खात होते. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याचेही स्मरण रहावे आणि स्वामीनिष्ठेचा गौरव केला जावा या दुहेरी हेतुने वाघ्या कुत्राचे स्मारक करण्याचे ठरवले गेले. त्यानुसार स्मारक समितीने शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतर त्वरीत आदरपुर्वक वाघ्याचे स्मारक बनवले. हे स्मारक तुकोजीराजांच्या देणगीतुन झाले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या स्मारकावर शिलालेखात आहे. म्हणजे या स्मारकावर पहिला हक्क होळकर घराण्याचा आहे. हे लक्षात न घेता झुंडशाहीने हे स्मारक हटवण्याची भाषा करणे निषेधार्ह आहे.

धनगर समाजासाठी कुत्रा हा दैवतासमान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचा लाडका कुत्रा वाघ्या हाच आहे आणि त्याची पुजा केली जाते. तुकोजीराव हे धनगर समाजातले होते त्यामुळे त्यांना वाघ्याबद्दल आत्मीयता आणी पुज्यभाव असणे स्वाभाविक आहे. जर तुकोजीरावांना आपल्या कुत्र्याचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी त्याचेच नाव स्मारकाला दिले असते. परंतु त्यांनी ते शिवरायांच्या वाघ्याचे स्मारक बनवले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशा स्थीतित वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व धनगर समाजाचा आणि समग्र ओ.बी.सी, भटके विमुक्त व तमाम शिवप्रेमींचा अवमान मानून त्याचा हे सर्व जण प्राणपणाने विरोध करतील असा इशारा आम्ही देत आहोत.

मराठा समाजातील इतिहासकार क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली विस्त्रूत शिवचरित्र प्रकाशित केले. त्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी अनुवादाचे खंड प्रकाशित करतांना त्यांना फार मोठे कर्ज झाले. "इतक्यात इंदोरचे उदार अधिपती श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांच्या कानी क्रुष्णरावांची करुण कहानी गेली. खरोखर त्या काळात क्रुष्णरावांची स्थीति अत्यंत करुणाजनक झालेली होती. इतक्यात इंदोरापधीतिंची २४००० रुपयांची (आजचे सुमारे रु. ६० लाख) उदार देणगी देवून जगातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांस फुकट वाटण्यासाठी इंग्रजी चरित्राच्या ४००० प्रती त्यांनी घेतल्या व त्या मुळ उद्देशानुरुप प्रमुख ग्रंथालयातुन ठेवण्याची व्यवस्था केली. अशा रीतिने क्रुष्णरावजी व्रुद्धापकाळी एका मोटःया काळजीतुन मुक्त झाले." (पहा-छत्रपती शिवाजी महाराज...ले. क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर, {प्रथमाव्रुत्ती...१९०६} ४थी आव्रुत्ती, वरदा प्रकाशन, पुणे-१६, प्रुष्ट क्र. नउ)

म्हणजे शिवचरित्र आणि शिवस्मारक या दोन्हींसाठी शिवप्रेमाने प्रेरीत होवून जे तुकोजीराजे पुढे आले त्यांचा अवमान करण्यासाठीच हा वाघ्याच्झा पुतळा काढुन टाकण्याची मागणी पुढे आली आहे हे लक्षात घेउन समग्र शिवप्रेमींनी याचा प्रतिकार केला पाहिजे. वाघ्याच्या पुतळ्याला हात जरी लावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडुन महाराष्ट्र पेटवू असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment