Monday 16 December 2013

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे  स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर 
या राज्याभिषेकाची एक पार्श्‍वभूमी आहे. तुकोजीराजे होळकर यांच्या मृत्युनंतर इंदूरची गादी काशीराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला देण्याचा घाट दुसरे बाजीराव व दौलतराव शिंदे यांनी घातला होता. पण काशीराव हे एक तर अत्यंत अकार्यक्षम तर होतेच पण अधुही होते. पण त्यामुळे होळकरांची संस्थाने आपल्याला गिळंकृत करता येतील असा दौलतरावांचा होरा होता. यासाठी शिंद्यांनी खरा लायक वारसदार म्हणता येईल अशा दुस-या मल्हाररावांचा पुण्यात खून केला आणि विठोजी व यशवंतराव या कनिष्ठ बंधुंना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. 
यानंतर शिंद्यांनी संपूर्ण होळकरी प्रांत घशात घातला व तेथे चिवेलियर डंडरनेक या फ़्रेंच सेनानीची नियुक्ती केली. दौलतरावांनी संपूर्ण उत्तरेसाठी जनरल पेरों या सेनानीची नियुक्ती केली होती तर डंडरनेक हा त्याच्याच अधिपत्याखाली इंदूरमध्ये ठाण मांडून बसला होता. अशा प्रकारे होळकरी संस्थाने पूर्णतया शिंद्यांच्या ताब्यात गेली होती. होळकरांचा सर्वच वारसा नाकारला गेला होता. पण यशवंतराव होळकरांनी खान्देशातील भिल्ल आणि पेंढार्‍यांच्या स्वतंत्र पलटनी उभारुन आपले परंपरागत राज्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष सुरु केला. शिंद्यांच्या लष्कराशी अनेक लढाया करत त्यांनी एकेक महाल मुक्त करायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी महेश्‍वरवर चाल केली. तेथे डंडरनेकच्या सैन्याचा त्यांनी गनिमी काव्याने घनाघाती प्रहार करत पराभव केला. डंडरनेकचे कवायती सैन्य होते सहा हजार घोडदळ तर दहा हजार प्रशिक्षित पायदळ. यशवंतरावांकडे फक्त दोन हजार घोडदळ होते तर पाच हजार पायदळ. तोफ एकही नाही तर डंडरनेककडे ६0 तोफा होत्या. परंतु त्यांनी डंडरनेकचा सपशेल पराभव केला. शेवटी स्वत डंडरनेक शिंद्यांची सेवा सोडून यशवंतरावांच्या सैन्यात सामील झाला. ही घटना घडली डिसेंबर १७९८ मध्ये.
तत्कालीन स्थितीत राज्य जिंकले असले तरी जनमान्यतेसाठी एकतर पातशाही मान्यता लागे किंवा मराठा राजमंडळाचा सदस्य व्हायचे असेल तर पेशव्यांची. पेशव्यांविरुद्धच बंड करुन स्वतंत्र राज्य निर्माण केले असल्याने पेशवे तशी मान्यता, विनंत्या करुनही, देणे शक्यच नव्हते. शिंदे तर या मानहानीमुळे सुडसंतप्त झाले होते. (त्याचीच परिणती विठोजींच्या क्रूर हत्येत झाली.) यशवंतराव होळकर हे अनौरस आहेत असा प्रवाद तेंव्हा असल्याने पातशहाही त्यांना (जशी पेशव्यांना देत असे) तशी वस्त्रे यशवंतरावांना देणे शक्य नव्हते.
अशा स्थितीत सार्वभौम राजा होण्यासाठी, खरे तर ज्या तत्कालीन कारणांमुळे शिवरायांनाही राज्याभिषेक करुन घ्यावा लागला, त्याच कारणांमुळे यशवंतराव होळकरांनी ६ जानेवारी १७९९ रोजी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. स्वत:चे राजचिन्ह आणि मुद्रा घोषित केली.
विस्मृतीत गेलेला पण इतिहासातील मोलाची घटना असलेला होळकरांचा राज्याभिषेक सोहळा यंदापासून मोठ्या प्रमाणावर त्यांचे जन्मस्थान, वाफगांव (ता. राजगुरुनगर) येथील किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाने उर भरुन यावा अशा घटनेचा उत्सव साजरा व्हायलाच हवा!
- संजय सोनवणी

No comments:

Post a Comment