Monday, 16 December 2013

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची ..........

पुतळ्यावरून वाद चालू आहे. इतिहासाची पुनर्मांडणी करताना ऐतिहासिक घटना, पात्रे यांच्या सत्यासत्यतेवरून वाद निर्माण होणे साहजिक आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जर कोणी मांडणी करत असेल तर तो भाग स्वीकारायला हरकत नाही. परंतु इथे प्रश्न आहे तो वाघ्या कुत्र्याचा. असा कुत्रा इतिहासात होवून गेला का नाही यावर बराच खल चालू आहे. हा वाघ्याचा पुतळा तुकोजीराव होळकरांच्या देणगीतून निर्माण झाल्यामुळे धनगर समाज्याच्या या पुतळ्याबद्दल अत्यंत पूज्य भावना आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा उध्वस्त करण्याची घोषणा केल्यापासून धनगर समाज आणि त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. धनगर समाजाच्या या अस्वस्थतेतून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला आहे. ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे जे सिद्ध होईल ते सत्य सर्वांनाच स्वीकारावे लागेल. परंतु संभाजी ब्रिगेडने पुतळा उध्वस्त न करता धनगर समाजाशी चर्चा करून विश्वासाने हा प्रश्न सोडवावा. नाहीतर मराठा विरुद्ध धनगर असा संघर्ष उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले तर बहुजन चळवळीची हानी होईल. वाघ्या कुत्र्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते झारगड मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती सर्वांच्या माहितीसाठी सह्याद्री बाणा वर उपलब्ध आहे.
- प्रकाश पोळ 
रायगड किल्ल्यावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा घाट संभाजी ब्रिगेडने घातला आहे. केवळ शिवचरित्रात वाघ्य्याच्या आस्तित्वाचे लिखित पुरावे सापडत नाहीत म्हणुन वाघ्याचे उच्चाटन करण्याचे त्यांचे हे प्रयत्न अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत असे पत्रक धनगर समाजातील अग्रणी नेते श्री. रामभाऊ वडकुते व झारगड मामा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे हे खरे असले तरी दंतकथांना सत्याच्या बीजाचा आधार असतो. सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरीं यांनी केवळ कल्पनेच्या जोरावर वाघ्याचे पात्र निर्माण केले असा युक्तिवाद संभाजी ब्रिगेड करत आहे तो ग्राह्य धरता येणार नाही. दुसरे असे कि ज्या जागेवर हे स्मारक उभारले गेले आहे तेथे पुर्वी एक उद्ध्वस्त चौथरा होता. तो चौथरा शिवाजी महाराजांच्या कोणा राणीचे असल्याचाही उल्लेख इतिहासात नाही किंवा तशी दंतकथाही नाही.  अशा स्थितीत वाघ्याचा वाद पेटवून त्यावर राजकारण करून समाज-स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बहुजन समाजामद्धे फुट पाडण्याची ही राजकीय चाल हाणुन पाडली जाईल असा इशारा त्यांनी या पत्रकात दिला आहे.

निधीअभावी  ज्यावेळी शिवस्मारकाचे काम अडुन पडले होते त्यावेळी मदत करायला पुढे सरसावले ते शिवप्रेमी तुकोजी महाराज.ही सर्वात महत्वाची बाब आज मुद्दाम दडवली जात आहे. शिवस्मारकासाठी एकमेव मोठी देणगी तुकोजीमहाराजांची आहे आणि त्या काळी त्यांनी शिवस्मारकाला रु. ५०००/- ची देणगी दिली. ही देणगी मागायला पुण्यातुन श्री. जी.व्ही. काळे आणि श्री ग.वि. केतकर इंदोरला गेले होते. त्याच वेळी  तुकोजीरावांच्या लाडक्या कुत्राचाही दुर्दैवाने म्रुत्यु झाला होता. तुकोजीराव दु:खात होते. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या लाडक्या कुत्र्याचेही स्मरण रहावे आणि स्वामीनिष्ठेचा गौरव केला जावा या दुहेरी हेतुने वाघ्या कुत्राचे स्मारक करण्याचे ठरवले गेले. त्यानुसार स्मारक समितीने शिवस्मारक पुर्ण झाल्यानंतर त्वरीत आदरपुर्वक वाघ्याचे स्मारक बनवले. हे स्मारक तुकोजीराजांच्या देणगीतुन झाले आहे असा स्पष्ट उल्लेख त्या स्मारकावर शिलालेखात आहे. म्हणजे या स्मारकावर पहिला हक्क होळकर घराण्याचा आहे. हे लक्षात न घेता झुंडशाहीने हे स्मारक हटवण्याची भाषा करणे निषेधार्ह आहे.

धनगर समाजासाठी कुत्रा हा दैवतासमान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचा लाडका कुत्रा वाघ्या हाच आहे आणि त्याची पुजा केली जाते. तुकोजीराव हे धनगर समाजातले होते त्यामुळे त्यांना वाघ्याबद्दल आत्मीयता आणी पुज्यभाव असणे स्वाभाविक आहे. जर तुकोजीरावांना आपल्या कुत्र्याचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी त्याचेच नाव स्मारकाला दिले असते. परंतु त्यांनी ते शिवरायांच्या वाघ्याचे स्मारक बनवले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अशा स्थीतित वाघ्याचे स्मारक हटवण्याचा प्रयत्न केल्यास तो सर्व धनगर समाजाचा आणि समग्र ओ.बी.सी, भटके विमुक्त व तमाम शिवप्रेमींचा अवमान मानून त्याचा हे सर्व जण प्राणपणाने विरोध करतील असा इशारा आम्ही देत आहोत.

मराठा समाजातील इतिहासकार क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली विस्त्रूत शिवचरित्र प्रकाशित केले. त्याच्या इंग्रजी, गुजराती व हिंदी अनुवादाचे खंड प्रकाशित करतांना त्यांना फार मोठे कर्ज झाले. "इतक्यात इंदोरचे उदार अधिपती श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांच्या कानी क्रुष्णरावांची करुण कहानी गेली. खरोखर त्या काळात क्रुष्णरावांची स्थीति अत्यंत करुणाजनक झालेली होती. इतक्यात इंदोरापधीतिंची २४००० रुपयांची (आजचे सुमारे रु. ६० लाख) उदार देणगी देवून जगातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांस फुकट वाटण्यासाठी इंग्रजी चरित्राच्या ४००० प्रती त्यांनी घेतल्या व त्या मुळ उद्देशानुरुप प्रमुख ग्रंथालयातुन ठेवण्याची व्यवस्था केली. अशा रीतिने क्रुष्णरावजी व्रुद्धापकाळी एका मोटःया काळजीतुन मुक्त झाले." (पहा-छत्रपती शिवाजी महाराज...ले. क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर, {प्रथमाव्रुत्ती...१९०६} ४थी आव्रुत्ती, वरदा प्रकाशन, पुणे-१६, प्रुष्ट क्र. नउ)

म्हणजे शिवचरित्र आणि शिवस्मारक या दोन्हींसाठी शिवप्रेमाने प्रेरीत होवून जे तुकोजीराजे पुढे आले त्यांचा अवमान करण्यासाठीच हा वाघ्याच्झा पुतळा काढुन टाकण्याची मागणी पुढे आली आहे हे लक्षात घेउन समग्र शिवप्रेमींनी याचा प्रतिकार केला पाहिजे. वाघ्याच्या पुतळ्याला हात जरी लावला गेला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडुन महाराष्ट्र पेटवू असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी......

या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना 
जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू रेखाटले. तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर यानीही आपल्या कार्याने सर्वांना प्रेरित केले आहे. या देशातील  क्रांतिकारक आणि अखेरचा सार्वभौम राजा असणारा यशवंतराव होळकर याच्या बलिदानाची काडीमात्र पर्वा न करता त्यालाही माथेफिरू रेखाटले. जणू काय होळकरांच्या खानदानालाच माथेफिरू बनण्याचा शाप होता.  होळकर घराण्यातील अनेकांनी सामान्य लोकांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. तरीही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. 


एक अहिल्यामाई यांचे नाव घेण्यापुरतेच होळकरांचे कर्तुत्व आहे असे सर्वांना वाटते. तसा समज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे. खंडेराव, मालेराव, तुकोजी, यशवंतराव, विठोजी होळकर यांचा संघर्ष समाजासमोर आलाच नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे सांगताना आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेकडो उदाहरणे देतो, परंतु आम्हाला क्रांतिकारी भिमाबाई होळकर आठवत नाहीत. भिमाबाई कोण होत्या हेही आम्हाला माहित नाही. आणि जे माहित आहे ते चुकीचे माहित आहे. खंडेराव, मालेराव, यशवंतराव सारेच कसे काय माथेफिरू ठरतात ? आणि माथेफिरू असूनही आभाळालाही लाजवेल असे कर्तुत्व या महामानवानी गाजवले कसे ? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे.

यापुढील काळात इतिहास लिहिताना या उपेक्षित क्रांतीकारी, बहुजन नायकांना न्याय देण्याचा प्रयत्न शिक्षित आणि जागृत बहुजन समाजाने केला पाहिजे. होळकर घराण्यातील कर्तुत्ववान पुरुष आणि स्त्रियांची खूप उपेक्षा झाली आहे. त्यांच्यावर इतिहास लेखकांनी आणि समाजाने अन्यायच केला आहे. त्यांचे वारसदार म्हणून नाव संगणारे आपण त्यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. सध्या या बाबतीत एक उत्कृष्ट म्हणावा असा प्रयत्न जेष्ठ लेखक संजय सोनवणी यांनी केला आहे. भारतीय इतिहासातील एक अजरामर व्यक्तिरेखा असणारे यशवंतराव होळकर यांचे चरित्र सोनवणी यांनी रेखाटले आहे. यशवंतरावांचे चरित्र लिहीत असताना सोनवणी यांच्यासमोर काही प्रमुख अडचणी होत्या. आजपर्यंत यशवंतराव होळकर या माणसाचे जे चरित्र आपणाला माहित आहे ते म्हणजे लुटारू आणि पुणे जाळणारा यशवंतराव. पुण्याशी असणारे यशवंतरावांचे हे वैर सर्वज्ञात आहे. परंतु त्यामागील नेमकी कारणमिमांसा सोनवणी यांनी केली आहे. यशवंतराव यांच्यावर जो पुणे जाळल्याचा आरोप केला जातो तो धादांत खोटा आहे हे सोनवणी यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले आहे. पुणे जाळणे तर दूरच, सामान्य माणसाला कोणताही त्रास होता कामा नये असा आदेशच यशवंतराव यांनी काढला होता. पुणे युद्धाच्या दरम्यान शिंदे यांच्या एका सरदाराचा वाडा जाळण्यात आला होता. याव्यतिरिक्त पुणे जाळले हा अपप्रचार आहे हे सोनवणी यांनी पुरावे देवून मांडले आहे. यशवंतराव होळकर हे राजे बनायला सर्व बाजूंनी समर्थ असतानाही त्यांना सत्तेची कोणतीही लालसा नाही हे यशवंतरावांचे चरित्र वाचताना पदोपदी जाणवते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होळकर संस्थानाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे श्रेय यशवंतराव होळकर यानांच जाते. 

यशवंतराव हे मल्हारराव होळकर यांचे दत्तकपुत्र तुकोजीराव यांचे धाकटे पुत्र. त्यांचे मोठे बंधू विठोजीराव यांना पुण्यात हत्तीच्या पायाशी देवून ठार मारले. अतिशय क्रूरपणे केलेल्या विठोजीच्या हत्येला पुणेकर साक्षी होते. विठोजी होळकर यांचा काहीएक अपराध नसताना सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या बाजीराव आणि त्याच्या साथीदारांनी विठोजीच्या हत्येचे फर्मान काढले. विठोजीला अपमानित करत साखळदंडांनी बांधून हत्तीच्या पायाशी सोडण्यात आले. पिसाळलेल्या हत्तीने विठोजीचा चेंदामेंदा करून टाकला. मानवतेला लाजवणारे हे कृत्य पुण्यनगरीत घडले. कोणाच्याही तोंडातून ब्र बाहेर पडला नाही. विठोजीच्या हत्येचा पुण्यात निषेध झालाच नाही. विठोजीच्या हत्येची बातमी यशवंतरावाला समजली आणि भावाच्या हत्येच्या बातमीने तो पेटून उठला. बाजीरावाची आणि त्याच्या साथीदारांची सत्तेची नशा उतरवण्यासाठी यशवंतराव पुण्यावर चालून आले. भ्याड बाजीराव पुणे सोडून पळून गेला. विठोजीच्या हत्येनंतर खरेतर यशवंतराव फार दुःखी झाले होते. तरीही त्यांनी बाजीरावाशी बोलणी करण्याची तयारी केली. परंतु यशवंतराव आपणाला जिवंत सोडणार नाही असे वाटल्याने चर्चेची सारी निमंत्रणे धुडकावून बाजीरावाने पलायन केले. पुण्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडून पळालेला बाजीराव इतिहासात खलनायक ठरत नाही, मात्र पुण्यातील सामान्य जनतेला कोणीही धक्का लावता कामा नये असा आदेश आपल्या सैन्याला देणारा, पदोपदी अपमान, अन्याय सहन करून या राष्ट्रासाठी, राष्ट्रातील सामान्य जनतेसाठी नेहमी चर्चेची तयारी ठेवणारा यशवंतराव खलनायक ठरला. इतका कि सकाळी उठल्यानंतर यशवंतरावाचे नावही घेवू नये असा प्रघात पडण्याइतपत. पुण्यावर होळकरी आली होती, म्हणजे यशवंतरावांनी पुणे बेचिराख करून टाकले अशी मांडणी केली गेली. पुणेकर यशवंतरावाविरुद्ध केलेल्या या अपप्रचाराला बळी पडले. अनेक वर्तमानपत्रे आजही हाच खोटा इतिहास प्रमाण मानून लेखन करत आहेत. 

नतद्रष्ट इतिहास लेखक आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारे लोक यांनी जरी यशवंतरावाच्या स्मृतीना करपू दिले तरीही काही लोकांनी खरे यशवंतराव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. शाहीर अमर शेख म्हणतात,
" शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला...
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! "  

आजपर्यंत यशवंतरावाचे, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे निपक्षपाती मूल्यमापन क्वचितच झाले आहे. यशवंतराव होळकर हे भारतीय भूमीत जन्माला आलेला एक हिरा आहे. आजपर्यंत या हिऱ्यावर उपेक्षेची, जातीद्वेषाची राख जमा झाली होती. ही राख झटकून यशवंतरावांचे खरे आणि निर्मळ चरित्र समाजासमोर आले पाहिजे. ऐतिहासिक पुरावे, कागदपत्रांच्या आधारे खऱ्या इतिहासाची मांडणी झाली पाहिजे. हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान बहुजन समाजाने स्वीकारले पाहिजे. अन्यथा त्यांच्या थोर महापुरुषांचा इतिहास असाच कलंकित केला जाणार. या पक्षपाती इतिहासाला नतदृष्ट इतिहासकार जेवढे जबाबदार आहेत तेवढेच आपणही जबाबदार आहोत. आपण कधी खऱ्या इतिहासाची आस धरली नाही हा आपला गुन्हा आहे. इथून पुढील काळात बुद्धीजीवी वर्गावर खरा आणि निपक्षपाती इतिहास लिहिण्याची जबाबदारी आहे. तो जर आप लिहिणार नसू तर भावी काळात आमच्या महापुरुषांना बदनाम केले म्हणून प्रस्थापित वर्गाच्या नावाने खडे फोडण्याचाही आपणाला अधिकार नसेल.

अधिक माहितीसाठी वाचा – 

अखेरचा सार्वभौम राजा : महाराजा यशवंतराव होळकर

महाराज यशवंतराव होळकर - यशवंत नायक मासिक

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकरांनी पुणे ना जाळले ना लुटले...

विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या...

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर

वैदिक राज्याभिषेक करुन घेणारे  स्वतंत्र सार्वभौम राज्याचे निर्माते यशवंतराव होळकर 
या राज्याभिषेकाची एक पार्श्‍वभूमी आहे. तुकोजीराजे होळकर यांच्या मृत्युनंतर इंदूरची गादी काशीराव या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला देण्याचा घाट दुसरे बाजीराव व दौलतराव शिंदे यांनी घातला होता. पण काशीराव हे एक तर अत्यंत अकार्यक्षम तर होतेच पण अधुही होते. पण त्यामुळे होळकरांची संस्थाने आपल्याला गिळंकृत करता येतील असा दौलतरावांचा होरा होता. यासाठी शिंद्यांनी खरा लायक वारसदार म्हणता येईल अशा दुस-या मल्हाररावांचा पुण्यात खून केला आणि विठोजी व यशवंतराव या कनिष्ठ बंधुंना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. 
यानंतर शिंद्यांनी संपूर्ण होळकरी प्रांत घशात घातला व तेथे चिवेलियर डंडरनेक या फ़्रेंच सेनानीची नियुक्ती केली. दौलतरावांनी संपूर्ण उत्तरेसाठी जनरल पेरों या सेनानीची नियुक्ती केली होती तर डंडरनेक हा त्याच्याच अधिपत्याखाली इंदूरमध्ये ठाण मांडून बसला होता. अशा प्रकारे होळकरी संस्थाने पूर्णतया शिंद्यांच्या ताब्यात गेली होती. होळकरांचा सर्वच वारसा नाकारला गेला होता. पण यशवंतराव होळकरांनी खान्देशातील भिल्ल आणि पेंढार्‍यांच्या स्वतंत्र पलटनी उभारुन आपले परंपरागत राज्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष सुरु केला. शिंद्यांच्या लष्कराशी अनेक लढाया करत त्यांनी एकेक महाल मुक्त करायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी महेश्‍वरवर चाल केली. तेथे डंडरनेकच्या सैन्याचा त्यांनी गनिमी काव्याने घनाघाती प्रहार करत पराभव केला. डंडरनेकचे कवायती सैन्य होते सहा हजार घोडदळ तर दहा हजार प्रशिक्षित पायदळ. यशवंतरावांकडे फक्त दोन हजार घोडदळ होते तर पाच हजार पायदळ. तोफ एकही नाही तर डंडरनेककडे ६0 तोफा होत्या. परंतु त्यांनी डंडरनेकचा सपशेल पराभव केला. शेवटी स्वत डंडरनेक शिंद्यांची सेवा सोडून यशवंतरावांच्या सैन्यात सामील झाला. ही घटना घडली डिसेंबर १७९८ मध्ये.
तत्कालीन स्थितीत राज्य जिंकले असले तरी जनमान्यतेसाठी एकतर पातशाही मान्यता लागे किंवा मराठा राजमंडळाचा सदस्य व्हायचे असेल तर पेशव्यांची. पेशव्यांविरुद्धच बंड करुन स्वतंत्र राज्य निर्माण केले असल्याने पेशवे तशी मान्यता, विनंत्या करुनही, देणे शक्यच नव्हते. शिंदे तर या मानहानीमुळे सुडसंतप्त झाले होते. (त्याचीच परिणती विठोजींच्या क्रूर हत्येत झाली.) यशवंतराव होळकर हे अनौरस आहेत असा प्रवाद तेंव्हा असल्याने पातशहाही त्यांना (जशी पेशव्यांना देत असे) तशी वस्त्रे यशवंतरावांना देणे शक्य नव्हते.
अशा स्थितीत सार्वभौम राजा होण्यासाठी, खरे तर ज्या तत्कालीन कारणांमुळे शिवरायांनाही राज्याभिषेक करुन घ्यावा लागला, त्याच कारणांमुळे यशवंतराव होळकरांनी ६ जानेवारी १७९९ रोजी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करुन घेतला. स्वत:चे राजचिन्ह आणि मुद्रा घोषित केली.
विस्मृतीत गेलेला पण इतिहासातील मोलाची घटना असलेला होळकरांचा राज्याभिषेक सोहळा यंदापासून मोठ्या प्रमाणावर त्यांचे जन्मस्थान, वाफगांव (ता. राजगुरुनगर) येथील किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाने उर भरुन यावा अशा घटनेचा उत्सव साजरा व्हायलाच हवा!
- संजय सोनवणी

Friday, 29 November 2013

महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. .......

महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. पैकी सर्वात प्रथम सातवाहन. त्यांनी साडेचारशे वर्ष सत्ता गाजवत महाराष्ट्र घडवला. सातवाहन हे मुलचे धनगर. दुसरी प्रदीर्घ काळ टिकलेली अत्यंत महत्वपुर्ण सत्ता म्हणजे देवगिरीच्या यादवांची. ही सत्ता साडेतिनशे वर्ष (सन ८३५ ते १३१८) टिकली. नुसती टिकली एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अमिट परिणाम सोडला. यादव हे मुळचे अहिर गवळी. म्हणजेच तेराव्या शतकापर्यंत धनगर-गवळ्यांनीच महाराष्ट्रावर सत्ता गाजवली. एक संस्कृतीचे निर्माण घडवले. आजही महाराष्ट्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या त्याच संस्कृतीचे अनुसरण करत आहे. पण फरक एवढाच आहे कि या दोन्ही समाजांना आजच्या संस्कृतीत जवळपास स्थान नाही.
इतिहासकारांनी सातवाहन व यादवांचा इतिहास फारसा लिहिलेला नाही. जोही लिहिला आहे तो जातीय दृष्टीकोनातुन लिहिलेला आहे. सातवाहनांच्या कुळाबद्दलही अकारण विओवाद निर्माण करुन ठेवला आहे. असो.

यादवांची सत्ता गेली आणि इस्लामी सत्ता आली. या काळापासुन मराठी संस्कृतीचे क्रमश: अध:पतन सुरु झाले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचे स्तोम वाढु लागले होतेच. धनगर-गवळी हे व्यवस्थेने शुद्रांत जमा करुन टाकले होते. असे असले तरी चवदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे दोन्ही समाज आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असेच होते.

परंतु प्रकृतीला कदाचित ही संपन्नता मंजुर नव्हती. महाराष्ट्रात १३९६ ते १४०८ या काळात एक भिषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे. तत्पुर्वीही अनेक पडले असतील पण दुर्दैवाने त्यांची नोंद नाही. या उपरोल्लिखित दुष्काळास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणुन ओळखले जाते. या दुष्काळात स्थिती एवढी भिषण होती कि गांवेचा गांवे ओस पडली. लाखो जनावरे, माणसे अन्न-पाण्याअभावी या दुष्काळात मरण पावली. लोक झाडांच्या साली, म्रुत जनावरे खावु लागली. शेवटी वेळ अशी आली कि माणसे मृत माणसांनाही खावु लागली.

१५९६ सालीही असाच भिषण दुष्काळ भारतभर पडला होता. अबुल फजल लिहितो कि "माणुस माणसाला खात होता आणि लहान मोठे रस्ते प्रेतांनी बंद केले होते."
त्यानंतरही १७व्या शतकात पडलेल्या लहान-मोठ्या दुष्काळांचे वर्णन मोरल्यंड या संशोधकाने केले आहे. १६१४ ते १६६० या काळात असे १२ दुष्काळ पडले होते. त्यात सर्वात मोठा दुश्काळ होता १६३० सालचा. हा त्यंत उग्र स्वरुपाचा असुन या दुष्काळाबद्दल व्ह्यन ट्विस्ट हा डच व्यापारी लिहितो:
"पाउस इतका अल्प पडला कि पेरणी केलेले बी वाया तर गेलेच, पण गवतही उगवले नाही. गुरे ढोरे मेली. शहरांतुन आणि खेड्यांतुन, शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्याने इतकी दुर्गंधी सुटली रस्त्यावरुन जाणे भयावह होते. गवत नसल्याने गुरे-ढोरेही प्रेतेच खावु लागली. माणसे प्राण्यांची प्रेते खायला येवु लागली. दुष्काळाची तीव्रता वाढु लागली तशी माणसे शहरे व खेडी सोडुन निराशेने दाही दिशा भटकु लागली....जेथे जावे तेथे प्रेतांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हते... "पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया स्वत:ला गुलाम म्हणुन विकुन घेत, आया बालकांची विक्री करत. काही कुटुंबांनी विष प्राशन करुन एकत्रीत म्रुत्युला कवटाळले....माणसांचे मांस उघडपणे बाजारात विकले जात होते..." या सतत पडलेल्या दुष्काळांनी कुणब्यांना जेवढे हवालदिल केले त्याहीपेक्षा अधिक पशुपालकांची भिषण अशी ससेहोलपट केली. पशुंना जगवणे अशक्य झाले. चारा नाही कि पाणी नाही. अन्नान्न करत माणसेच जेथे मरत होती तेथे मुक्या शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशींचा काय पाड लागणार? या दुष्काळांनी धनगर-गवळ्यांचा आर्थिक कणाच मोडुन टाकला एवढे मात्र खरे. सारी अर्थव्यवस्था कोलमडुन पडली. त्यात सुलतानी प्रहार होतच होते. धर्म नष्ट व्हायच्या बेतात आलेला. सुकाळ आल्यावर शेती पुन्हा उमलु लागली हे खरे, पण पशुंची पुन्हा नव्याने पैदास करत उभारी धरायला पशुपालकांना मात्र वेळ लागला. ते मागे पडु लागले. पुर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करता येणे जवळपास अशक्यच झाले.
शेतक-यांनी नदी-ओढ्याकाठच्या जमीनी व्यापल्या होत्या. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता बघता ते संयुक्तिकही होते. धनगरांनी मात्र चा-यासाठी व्यापलेल्या जमीनी या जवळपास ओसाड, गवताळ आणि डोंगराळ होत्या. त्यामुळे पावसाळी काळ सोडला तर दुसरे पीक घेता येणे अशक्यच होते. आजही या स्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे धनगर समाज हा निमभटकाच राहिला. म्हणजे पानकळ्यात धनगर वाड्यात थांबुन जमेल तेवढे कसायचे आणि पानकळा संपला कि चा-याच्या शोधात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेवून चारी दिशा फिरत रहायचे.
पण यामुळे धनगर समाजाचा एक अप्रत्यक्ष फायदाही झाला. महाराष्ट्रातील दुर्गमातिदुर्गम प्रदेश त्यांनी पायतळी तुडवला असल्याने हाताच्या रेषांइतकाच महाराष्ट्र त्यांना तोंडपाठ झाला. आज जे डोंगरी गड-कोट-किल्ले महाराष्ट्रात दिसतात त्या जागा शोधण्याचे श्रेय धनगरांकडेच जाते. आजच्या बोरघाटाचा मार्गही शिंग्रोबा नामक धनगरानेच इंग्रजांना दाखवला. रायगडावरील हिरकणी बुरुजाची कथा कोण विसरेल? हिरकणी ही धनगरच. अभेद्य अशा समजल्या जाणा-या रायगडावरील चोरवाटही तिला माहित होती. छ. शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करुन ती चोरवाट बंद करण्यासाठी बुरुज बांधला. तो आजही हिरकणी बुरुज म्हणुन ओळखला जातो.
धनगरांनी राजसत्तांना केलेली मोलाची मदत म्हणजे हेरगिरी. सतत भटकंती असल्याने व चा-यासाठीच हिंडत असल्याने शत्रुमुलुखातील हालचाली त्यांना आपसुक कळत. छ. शिवाजी महाराजांनी नुसत्या गडकोटांसाठी नव्हे तर हेरगिरीसाठीही त्यांचा उपयोग करुन घेतला...पण सर्वात महत्वाचा उपयोग म्हनजे गनीमी कावा.
आधीच सांगितल्याप्रमाणे दुर्गमातिदुर्गम भागांतील वाटा-चोरवाटाही त्यांना तोंडपाठ असल्याने शत्रुवर छापा मारण्यासाठी वाटाडे असत ते धनगरच. कुत्र्यांचा उपयोग अशा छाप्यांत कसा करुन घ्यायचा हे शिकवले ते धनगरांनीच. "Native Breeds of India-Mudhol" या प्रबंधात डा. बी. सी. रामचंद्रन आणि डा. पी. व्ही. यतिंदर म्हणतात कि गनीमी काव्याने शिवाजी महाराज जेंव्हा छापा टाकण्यास जात तेंव्हा आधी प्रशिक्षीत कुत्र्यांची फौजच शत्रुच्या छावणीवर तुटुन पडे. शत्रुच्या गोटात धावपळ व्हायला लागली कि मग मावळे तुटुन पडत व शत्रुची कत्तल करत. औरंगझेबाने या पद्दतीच्या हल्ल्यांची दहशत घेतली होती असेही या लेखकद्वयाने नमुद करुन ठेवले आहे. थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत धनगर समाजाने महत्वाचे योगदान दिले. अर्थात या योगदानाचा विसर आपल्या इतिहासकारांना पडला. सामाजिक इतिहास हा मुळात मराठीत लिहिला गेलाच नसल्याने असे घडले हेही खरे.
सतत निसर्गाच्या सहवासात, एकाकी खुल्या आभाळाखाली रहायची सवय यामुळे धनगरांच्या दृष्टीकोनात व्यापकता येणे स्वाभाविक होते. सातवाहन, यादवांनी ती व्यापकता दाखवलेली होतीच. या दोन्ही समाजांचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय दृष्टी. आणि तिची मध्ययुगात चुणुक दाखवली ती मल्हारराव होळकरांनी. खानदेशात राहुन मल्हाररावांनी माळव्यावर स्वतंत्रपणे स्वा-या करत मोगल सत्तेला हादरे द्यायची सुरुवात अवघ्या पाचशे बारगीर-शिलेदारांच्या सैन्यासह सुरु केली. बाळाजी विश्वनाथाच्या दिल्ली स्वारीत स्वतंत्रपणे सहभाग घेतला. मल्हाररावांच्या पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीची जाणीव याच कालात बाजीरावाला झाली. त्याने पेशवा होताच मल्हाररावांना माळव्याचा सुभेदार म्हणुन नेमले. मराठेशाहीतील सुभेदार पद दिले गेलेले एकमेव सेनानी म्हणजे मल्हारराव. मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली. राष्ट्रीय दृष्टीची सकारात्मक बाजु दाखवणारी दुसरी महान स्त्री म्हणजे अहल्यादेवी. त्यांनी रामेश्वरपासुन ते काश्मीरपर्यंत आणि पेशावर पासुन बंगालपर्यंत जेवढी समाजोपयोगी वास्तुंची, मंदिरांची जीर्णोद्धार ते नवनिर्मिती करत महान राष्ट्रीय कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. १८०२ पासुन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका ओळखत त्यांच्या विरुद्ध एकहाती स्वातंत्र्यलढा उभारला. अठरा युद्धे केली आणि सर्व युद्धांत विजय मिळवला. दुर्दैवाने त्यांच्यावर मृत्युने अकाली घाव घातला. पण त्यांची पत्नी तुळसाबाई यांनी इंग्रजांना तब्बल सात वर्ष आपल्या राज्यापासुन दुर ठेवले. शेवटी इंग्रजांनी फितुरीचा फायदा घेत तुळसाबाईंचा खुन केला तेंव्हाच त्यांना होळकरी राज्याचा घास घेता आला. पुढे तरीही भिमाबाईने गनीमी काव्याचाच वापर करत इंग्रजांशी युद्ध सुरुच ठेवले. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणुन जागतीक इतिहासात त्यांचे नांव नोंदले गेले आहे...अर्थात आम्हाला त्याचे फारशी पर्वा नाही. खुद्द मल्हाररावांसारख्या मुत्सद्दी सेनानीला "धनगर" म्हणुन त्यांच्या कालात हिनवले जात होते...तर इतरांची काय कथा?
होळकरी युगात धनगरांनी युद्धशास्त्रात प्रगती केली. संताजी वाघांसारखे...भाऊसाहेब पेशव्यांना वाचवण्यासाठी बलिदान देणारे महान सरदार झाले...पण सामाजिक परिप्रेक्षात धनगरांचे स्थान तीळमात्र बदलले नाही...
(क्रमश:)

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -

महाबळेश्वर हे मुळचे महाबळे आडनावाच्या धनगर समाजाचे -
महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण म्हणून क्षेत्र महाबळेश्वर प्रसिद्द आहे, गावाचे मूळ नाव महाबळेश्वर हे महाबळे या धनगर आडनावाचे होते, महाबळे या आडनावाचा धनगर समाज हा मुळचा महाबेश्वरचा . नंतर इथे इतर धनगर समाज पण वसला ती आडनावे आहेत ढेबे,आखाडे,हिरवे.तसेच या समाजाची डोंगर रानाला शेती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे.हि लोके प्रमुक्याने स्टॅनबेरीज, रासबेरीज ची लागवड करतात, आणि जेम च्या कारखान्यांना पुरवठा करतात.

इतिहास- इ.स १२१५ मध्ये सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने कृष्णा नदीच्या उगमाजवळ एक मंदिर आणि पाणी पिण्याचे जलकुंड बांधले. तसेच या परिसराच्या जवळ प्रतापगड हा प्रेक्षणीय किल्ला आहे.

नंतर च्या काळात येथील वातावरण आणि निसर्ग श्रुष्टी पाहून ब्रिटीश सरकारने याला हिल स्टेशन चा दर्जा दिला,

येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. —
info by मनजित रायभान कोळेकर